मावळ, बारामती मतदार संघासह राज्यात 8 ते 9 ठिकाणी ‘राज’गर्जना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी भाजपचा पराभव करण्यासाठी मनसे सरसावली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्यात 8 ते 9 ठिकाणी भाजपविरोधात सभा घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पुणे जिल्हयातील महत्वाच्या मावळ व बारामती लोकसभा मतदार संघात राज ठाकरे सभा घेणार असल्याने त्याचा निश्‍चितपणे फायदा राष्ट्रवादीला होणार आहे.

आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थित न राहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतंत्र सभा घेवुन भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना विरोध करणार आहेत. मावळ, बारामती, सातारा, सोलापूर, नांदेड, ठाणे, नाशिक आणि मुंबईतील महत्वाच्या 3 मतदार संघात राज ठाकरे हे सभा घेतील अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यास अद्याप मनसेकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मनसेच्या 13 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष केले होते. गुडी पाडव्याच्या मेळाव्यानंतर राज ठाकरे कधी आणि कोठे सभा घेणार हे स्पष्ट होणार आहे.

पुणे जिल्हयात बर्‍यापैकी मनसेला जनाधार आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मावळ आणि बारामती लोकसभा मतदार संघात सभा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी सभा घेतल्यास त्याचा निश्‍चितच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना होणार आहे. मावळ लोकसभा मतदार संघातुन पार्थ अजित पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तर बारामतीमधून खा. सुप्रिया सुळे या निवडणुक लढवित आहेत. राज ठाकरे यांच्या सभेचा पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांना फायदा होणार आहे.