‘म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय !’ राज ठाकरेंचा मोदींवर व्यंगचित्राद्वारे निशाणा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र्र नवनिर्मण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे केवळ नेते म्हणून ओळखले जात नाहीत तर उत्तम व्यंगचित्रकार म्हणून देखील ओळखले जातात. राज ठाकरे यांनी त्यांच्या अनेक व्यंगचित्रातून मोदी सरकारला झोडपले आहे. आता राज ठाकरे यांनी एक नवे व्यंगचित्र रेखाटले आहे.  “काँग्रेसने मोदींना छळले, म्हणून मोदी जनतेला छळत असल्याचा टोला राज ठाकरे यांनी या नव्या व्यंगचित्रातून लगावला आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन नरेंद्र मोदींवर निशाणा साधणारे व्यंगचित्र शेअर केले आहे”.
गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला काँग्रेसने छळले होते, असे मोदींनी म्हटले होते. या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे. काँग्रेसने मला छळले, म्हणून मी जनतेला छळतो, असे या व्यंगचित्रात रेखाटण्यात आले आहे.
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले होते. देशाची २००४ ते २०१४ ही मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील वर्षे वाया गेली आणि भ्रष्टाचार करता यावा म्हणून अनेकांना अशक्त सरकार हवे असते, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती. गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसने माझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर वाटेल ते आरोप करुन माझा छळ करण्यात आला असे मोदींनी सांगितले होते. या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे.
राज ठाकरेंच्या व्यंगचित्रातून थापांचे पतंग 
राज यांनी याआधी संक्रांतीला पंतप्रधान मोदी थापांचे पतंग उडवत असल्याचं व्यंगचित्र रेखाटलं होतं. अमित शहा, भक्त आणि काही मीडियासोबत मोदी पतंग उडवत होते. १० टक्के सवर्ण आरक्षणाचा पतंग आकाशात उडत आहे आणि आधी दिलेल्या आश्वासनांचे पतंग गच्चीत पडले आहेत, असं व्यंगचित्र काढून राज यांनी आरक्षणाच्या निर्णयावरुन टोला लगावला होता.