महाआघाडीत जायचं की नाही ? मनसे अजूनही संभ्रमात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाआघाडीत जायचं की नाही यावर मनसे अजूनही संभ्रमात आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती झाली आहे. त्यांच्यात जागा वाटपही झाले आहे. पण मनसे राज्यात कोणासोबत जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यावर मनसेकडून महाआघाडीत जाण्यासाठी प्रतिसाद मिळेल, असं वाटलं होतं. पण तसा कोणताही निर्णय अजून झालेला नाही. अजून मनसेचं तळ्यामळ्यात सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे.

लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची आचारसंहिता सुद्धा जाहीर होईल. युती आणि आघाडीतील पक्षांनी आपापली रणनीती आखली आहे. पण मनसे मात्र मागे आहे. आघाडीत जायचं की नाही, किती जागा लढवायच्या यावरच मनसेचं घोडं अजून अडलेलं पाहायला मिळत आहे. राज्यातील मनसेचं प्राबल्य पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोणतेही पत्ते उघडे करताना दिसत नाहीत.

मनसेच्या संभ्रमाचे मुद्दे काय आहेत?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांची भेट झाली खरी पण आघाडीत जाणार का हे नक्की नाही. मनसेला राष्ट्रवादी आघाडीत घेणार, पण काँग्रेस घेणार का हे अजून स्पष्ट नाही. मनसे आघाडीत आली तर किती जागा दिल्या जाणार आणि कोणत्या हे ही स्पष्ट नाही. आघाडीत जाऊन दोन जागा लढायच्या की एकटं राहून जास्त जागा लढायच्या यावरही मनसेत अजून एकमत होत नाही.
आघाडीत जाऊन फक्त दोन जागा लढून पक्षात उभारी येणं अशक्य असल्याचं काही नेत्यांचं मत आहे.

मनसेला राष्ट्रवादी कल्याण लोकसभा मतदारसंघ सोडू शकते, पण मनसेला फक्त जागा लढायची नाही. मनसेला मात्र अधिक जागेची अपेक्षा आहे. राज ठाकरे उद्यापासून पुणे, कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर जात आहेत. या कारणांमुळे निवडणुकीबाबात घोषणा ही पुढील आठवड्यात होऊ शकते. पण आगामी येणाऱ्या निवडणुकीची सर्व तयारी सुरू आहे असे मनसे नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. असं असलं तरी मनसे नेते सुद्धा साहेब काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस मनसेला साथ देत आहे हे जरी खरं असलं तरी राष्ट्रवादीचे अंतर्गत नेते मात्र याला विरोध करत आहेत. मनसेला मुंबईत जागा देण्यात येऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी घेतली आहे. मनसे सोबत आली किंवा नाही तरी फायदा आघाडीला होईल, असं अहिर म्हणाले. मनसेची मराठी मताचं प्राबल्य म्हणून किंगमेकर ठरण्याइतकी परिस्थिती सध्या तरी नाही. मनसेने आघाडीसोबत जाणं योग्य ठरणार आहे. एक-दोन जागा लढून पक्षात थोडीशी उभारी येईल याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेला होऊ शकतो, असं विश्लेषकांचं मत आहे. यावर राज ठाकरे कोणेता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You might also like