‘बाई जरा दमानं घ्या’, मनसेच्या रूपाली पाटलांचा अमृता फडणवीसांना ‘खोचक’ सल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेमध्ये ट्विटर वॉर सुरु असून यामध्ये आता मनसेने उडी घेतली आहे. पुणे मनसेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करून अमृता फडणवीस यांना सल्ला दिला आहे. रुपाली पाटील-ठोंबरे यांनी ‘बाई जरा दमानं घ्या’ अशी पोस्ट करून त्यांना खोचक सल्ला दिला आहे.

अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ठाकरे आडनावावरुन केलेल्या टीकेच्या वादात मनसेने उडी घेतली आहे. रुपाली पाटील-ठोंबरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ठाकरे नाव लावून ठाकरे होता येत नाही हे बोलणाऱ्या डोक्यावर पडल्या आहेत. बाई ते ठाकरे घरात जन्मले म्हणजे ठाकरेच होणार त्यात नाव लावण्याचा प्रश्न येतो कुठे ? मिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवल्या आता तुम्ही भानावर या काहीही बिनबुडाचे बोलू नका. स्वत:चा अपमान करुन घेता. लवकर शुद्धीत या आणि गणपती बाप्पाला सदबुद्धी मागा लवकर देईल बाप्पा सदबुद्धी, असे म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी केलेल्या ट्विटचा आधार घेत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. केवळ ठाकरे आडनाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही… त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते. यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका सुरु झाली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/