मनसेचे ‘इंजिन’ आज घेणार ‘यु टर्न’ ? भविष्यातील भाजपाबरोबरील युतीविषयी ‘उत्सुकता’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेचे आज पहिले राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सकाळी १० वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदुत्वाबाबत काय बोलणार तसेच ते पुन्हा एकदा भाजपाबरोबर जाणार का या विषयी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. महाराष्ट्रातील भविष्यातील राजकारणात होऊ शकणाऱ्या बदलाची ही सुरुवात असू शकते याची सर्वाचे लक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाकडे लागलेले आहे.

मनसेच्या या अधिवेशनासाठी २० ते २५ हजार कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात मनसेचा नवीन भगवा झेंडा झळकणार आहे. महाअधिवेशनानिमित्त मनसेने मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी केली आहे. त्यावरुन पूर्वीचा झेंडा गायब आहे. नव्या झेंड्याचे स्वरुप कसे असणार हे जरी अजून स्पष्ट नसले तरी नव्या झेंड्याचा रंग हा भगवा असणार आहे. त्यावरुन राज ठाकरे याची हिंदुत्वाची भूमिका अधिक ठळक होत आहे.

पाच वर्षापूर्वी २०१४ मध्ये राज ठाकरे हे नरेंद्र मोदी यांची तोंड फाटेतोवर स्तृती करीत होते. शिवसेनेविरोधात उमेदवार उभे करताना मनसे भाजपाला पाठिंबा देणार अशी घोषणा केली होती. मात्र, त्याचा मनसेला मोठा तोटा झाला. मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला. तोही शेवटी शिवसेनेत गेला. मधल्या पाच वर्षात मनसेत मरगळ आली. नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देऊन उलट तोटाच झाला. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्याशी जवळीक असल्याचे दाखवत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर मोठी टिकेची झोड उठविली.

मनसेचा उमेदवार उभा न करता काँग्रेस आघाडीला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी घेतलेल्या सभांमधील ‘लाव रे तो व्हिडिओ’ खूप लोकप्रिय झाले. पण त्याचा फायदा आघाडीला झाला नाही. विधानसभेत आघाडीनेही त्यांना जवळ केले नाही. विधानसभेत मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला. भाजपा शिवसेनेचे फाटल्यानंतर महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर आता काँग्रेस आघाडीत आपल्याला स्थान असणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर राज ठाकरे यांनी भाजपाची साथ देण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे. त्यातूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट चांगलीच गाजली.

त्यात केंद्र सरकारच्या सीएए ला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. मुंबईतील बांगला देशीयांना हाकलून लावण्याची आपली भूमिका अधिक कठोर करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. शिवसेना दूर गेल्यावर भाजपाही राज्यातील आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी कोणत्या तरी टेकूची आवश्यकता आहे. त्यातूनच भाजपा व मनसे जवळ येत असल्याचे संकेत दिले जात आहे.मनसेच्या या अधिवेशनात त्याविषयी राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सर्वांचे त्याकडे लक्ष असणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –