मनसेच्या महाअधिवेशनाच्या तयारी बैठकीत नेत्यांमध्ये ‘वाद’, अंतगर्त वाद चव्हाट्यावर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसेच्या महाअधिवेशनाच्या तयारीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक राडा झाला. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर आणि सरचिटणीस- मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे समजत आहे. मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष बाब म्हणजे पक्षातील सर्व पदाधिकारी आणि नेत्यांसमोर हा प्रकार घडला आहे. राजगड या पक्षाच्या कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बाळा नांदगावकर प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते की, “गेल्या 13 वर्षात पक्ष वाढीसाठी आम्ही नेते कमी पडलो. पक्षाच्या महिला, विद्यार्थी आणि कामगार संघटनाही कमी पडल्या” असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानांनीच पक्षात नाराजी आहे. या नारजीमुळे आज झालेल्या बैठीक वाद झाल्याचे समजत आहे.

विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असलेले आदित्य शिरोडकर नांदगावकरांच्या वक्तव्यामुळे नाराज झाले होते. त्यामुळे आज जी बैठक झाली त्यात त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा पाढाच वाचून दाखवला. याच दरम्यान शिरोडकर आणि नांदगावकर यांचे खटके उडाले. नांदगावकर आणि शिरोडकर यांच्यातील हा वाद मिटवण्यासाठी अखेर पक्षातील इतर नेत्यांनाही मध्यस्थी करावी लागली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/