‘काळजी नका करू शेलार भाऊ बारावा गडी म्हणून तुम्हालाच साद घालतील’ : मनसेचं प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘गोलाकार खेळाडू तुमचे थकतील काळजी नका करू शेलार भाऊ बारावा गडी म्हणून तुम्हालाच साद घालतील’ असं म्हणत मनसेने भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करण्यात आले आहे. आशिष शेलार यांनी काल (गुरुवार दि 28 मार्च) ट्विट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे असं ट्विट शेलार यांनी केलं आहे. यांच्या या टीकेला मनसेने उत्तर दिले आहे.

काय आहे मनसेचे ट्विट ?
मनसेने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मोदीमित्रांची चैन झाली भारतीयांच्या कष्टावर.. चेंडूफळीचा खेळ तुमचा, बारामतीच्या उष्ट्यावर.. त्रिफळा उडवू मोदी शहांचा, गोलाकार खेळाडू तुमचे थकतील.. काळजी नका करू शेलार भाऊ बारावा गडी म्हणून तुम्हालाच साद घालतील.” असे म्हणत मनसेने #हुकलेलं मंत्रिपद असा हॅशटॅगही वापरला आहे.

काय होते आशिष शेलार यांचे ट्विट ?

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काल राज ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली होती. आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणाले होते की, “सोडून गेले आमदार, एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही.. जाणत्या राजाला गाठले.. पाठीवर हात ठेवून नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन.. बारामतीच्या काकांनी फक्त लढ असे म्हटले ”शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे” असे म्हणत आशिष शेलार यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली होती. यामध्ये #ChokidarकेSideEffects असा हॅशटॅगही वापरण्यात आला होता.