‘मनसे’ नेत्यानं घेतली इंदुरीकर महाराजांची भेट, झाली बंद दाराआड चर्चा

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन टीम –  जाहीर कीर्तनात दिलेल्या पुत्रप्राप्तीचा सम-विषम तारखांच्या संदर्भामुळे कीर्तनकार इंदोरीकर महाराज कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. या चक्रव्यूहातून त्यांना बाहेर काढण्यासाठी अनेक संघटना, वारकरी सांप्रदायाने रस्त्यावरती उतरण्याचा इशारा दिला आहे. अशातच आता या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचं दिसत आहे. मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी इंदोरीकर महाराजांची भेट घेतली.

संगमनेर तालुक्यातील ओझर येथील निवासस्थानी अभिजित पानसे यांनी जाऊन इंदोरीकर महाराजांची भेट घेतली. तेव्हा अभिजित पानसे आणि इंदुरीकर महाराज यांच्यात बंद दाराआड अर्धातास चर्चा झाली. त्यानंतर पत्रकांराशी बोलताना पानसे म्हणाले, ‘एखाद्या छोट्या वक्तव्यावरुन इतकी टोकाची भूमिका चुकीची आहे. इंदुरीकर महाराजांचे कार्य देखील महत्वाचे आहे. अनाथ मुलांसाठी शाळा चालवत आहे, समाज प्रबोधनाचं मोठं काम विसरुन चालेल का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच,’ही इंदुरीकर महाराज यांची सदिच्छा भेट होती. सरकारने काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे, असं सुद्धा पानसे यांनी म्हटलं. तर इंदुरीकर महाराजांनी या भेटीबाबत बोलण्यास नकार दिला.

दरम्यान, यापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही कादेशीर नोटीस बजावली होती. आता या नोटीसीला इंदुरीकर महाराज यांनी वकिलामार्फत उत्तर दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, निवृत्ती महाराज देशमुख यांचे कोणी समर्थक नाही. निवृत्ती महाराज कुठल्याही समर्थकांना ओळखत नाही. काही अज्ञात लोकांनी काही उद्योग केले असतील तर, त्याला निवृत्ती महाराज जबाबदार नाही, अशी भूमिका पाठवलेल्या नोटिसीमध्ये निवृत्ती महाराज यांनी मांडली आहे.

पूत्रप्राप्तीबाबत सम-विषम तारखेचा संदर्भ देवून कीर्तनातून इंदोरीकर महाराजांनी केलेल्या एका विधानाचे पडसाद राज्यभर उमटले. त्यांच्यावर आरोग्य विभागाने पीसीपीएनडीटी (गर्भलिंग निदान कायदा) नुसार संगमनेर येथील न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत त्यांना समन्स बजावण्यात आले असून, येत्या ७ ऑगस्ट रोजी त्यांना आपल्या वकीलासह न्यायालयात हजर राहून जामिन घ्यावा लागणार आहे. हा आरोप मान्य नसल्यास त्यांना वरीष्ठ न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचीही परवानगी आहे.