मनसेचे नेते संजय राऊतांवर संतापले, टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आक्रमक शब्दांमध्ये टीका करण्यात आली. मनसेप्रमुखांवर झालेल्या टीकेनंतर पक्षाचे नेते आता मैदानात उतरले आहेत. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक पोस्ट लिहून संजय राऊत यांचा खरमरीत शब्दांत समाचार घेतला आहे. ’बोलबच्चनचा हॅगओव्हर! मैं किस पथ से जाऊँ ? असमंजस हैं भोलाभाला…खूप दिवस झाले… हल्ली कुणीच विचारत नाही मला !!!! ‘मधुशाला’ मधली ही ओळ खास बोल बच्चन राऊतसाठी. नागू सयाजी वाडीत बसून शब्दांचे बुडबुडे काढणारे संजय राऊत हे सध्या आपल्याकडे कुणीच लक्ष देत नाही या भावनेने पछाडलेले दिसतात. अन्यथा राजसाहेबांनी केलेली सूचना त्यांच्या कार्यकारी टाळक्यात शिरली असती,’ असा हल्लाबोल अमेय खोपकर यांनी केला आहे.

राज ठाकरे यांनी वाईन शॉप सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सामनातून ठाकरेंवर टीका करण्यात आली होती. त्या टीकेला अमेय खोपकर यांनी उत्तर दिले आहे. राजसाहेबांनी जी सूचना केली ती ताकाला जाऊन भांडे न लपवता केली आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट असताना आता नैतिकतेच्या मायाजालात न अडकता वैधानिक मार्गाने काही उपाय अवलंबण्याची आवश्यकता आहे. त्यात तळी उचलून धरण्याचा प्रश्न कुठे येतो? आणि केवळ दारूच नव्हे, तर उपाहारगृहे आणि अन्य व्यवहारदेखील सुरू करण्याचीही सूचना राजसाहेब यांनी केली, हे या रडतराऊतांच्या रिकाम्या डोक्यात शिरलेले दिसत नाही.

त्यामुळेच राजसाहेबांच्या विधायक सूचनेची खिल्ली उडवण्याचा विचार आला असावा. आणखी एक, तुमचे संकटमोचक अजित पवारांनीही हीच मागणी करणारे पत्र देशाच्या प्रधानमंत्र्यांना लिहीले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही असेच विधान काही दिवसांपूर्वी केले होते. तेव्हा त्यांची खिल्ली उडवण्याची हिंमत या बोरूबहाद्दराला झाली नाही, की मालकांची भीती वाटली? बोला रडत राऊत बोला! नागू सयाजी वाडीतल्या बोरूबहाद्दरांची ‘फ्रायडे नाईट’ जोरदार रंगली असावी, आणि त्याच हॅगओव्हरमध्ये राजसाहेबांच्या पत्रातले सविस्तर मुद्दे बुडाले. की जे राजसाहेबांना सुचले ते आपल्याला आधी का सुचले नाही, या दु:खाच्या बेहोषीत ‘डाईन, वाईन…’ वगैरे शब्दांचे खेळ कागदावर सांडले? अशी टीका करण्यात आली आहे.