’10 रुपयाच्या थाळीसोबत 20 रुपयांची बिस्लेरी पिणारा गरीब माणूस’, आव्हाडांवर मनसेची खोचक टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये शिवभोजन केंद्रांना प्रजासत्ताक दिनापासून सुरुवात करण्यात आली. शिवभोजन थाळीमुळे गरजू आणि गरीब लोकांची भूक भागणार असून बचत गटांना यामधून रोजगार उपलब्ध होणार आहे. कमी दरात पोटभर जेवण देणारी सरकारची योजना राज्यात सुरु झाली असून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील मनिषा नगर येथील शिवभोजन केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी 10 रुपयात मिळणाऱ्या या थाळीचा आस्वादही घेतला.

मात्र आव्हाड यांच्यासोबत 10 रुपयांच्या थाळीसोबत 15 रुपयांची पाण्याची बाटली असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 10 रुपयांच्या थाळीसोबत पाण्याची बाटलीही मिळणार का ? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. विशेष म्हणजे 10 रुपयांच्या थाळीसोबत 15 रुपयांची पाणी बॉटल असल्याने गरिबांनाही थाळीसोबत पाणी बॉटल मिळणार का, असे म्हणत आव्हाड यांचा फोटो व्हायरल करण्यात येत आहे.

यावरून मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. अमय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाड यांचा शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतानाचा फोटो ट्विट केला आहे. तसेच या फोटोला ’10 रुपयाच्या थाळीसोबत 20 रुपयांची बिस्लेरी पिणारा गरीब माणूस’ असे कॅप्शन देत त्यांनी आव्हाडांना खोचक टोला लगावला आहे.

You might also like