‘रडण्या’ पलीकडे काय अपेक्षा ठेवणार, सोनू सूदवरील टिप्पणीनंतर मनसेचा राऊतांना सणसणीत टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मुळगावी जाण्यास मदत करण्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या लेखातून सडकून टीका केली आहे. त्याच्या टीकेनंतर मनसेनंही सोनू सूदची बाजू घेत संजय राऊतांना सणसणीट टोला लगावला आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी सोनू सूदने केलेल्या कामाचं कौतुक करून संजय राऊत यांच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विटकरून त्यांना चांगल्या कामाचे कौतुक करा, असा सल्ला दिला आहे. तसेच आपण हा अग्रलेख लिहण्या पलिकडे काय केलं असा सवाल देखील खोपकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच ज्याने काम केलय त्याचे कौतुक करूया, मनाचा मोठेपणा दाखवुया असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे ‘रडण्या’ पलिकडे तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवणार असा सणसणीत टोला देखील अमेय खोपकर यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

तत्पूर्वी भाजपचे नेते राम कदम यांनी देखील संजय राऊत यांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे. स्वत:ही करायचं नाही. सोनू सूदसारखे लोक माणुसकीसाठी पुढे येऊन गोरगरीबांना मदत करत आहेत, त्यांचे कौतुक करायचं सोडून त्यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत टीका करत आहेत. हाच तुमचा माणुसकीचा धर्म आहे का ? असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले होते राऊत ?

दरम्यान, संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामानाच्या रविवारच्या पुरवणीत रोखठोक सदरात अभिनेता सोनू सूदवर सडकून टीका करत भाजपवर निशाणा साधला.

राज्याराज्यांची सरकारे या स्थितीत हतबल झालेली मी पाहीली. मजूर चालतच निघाले व लाखो मजूर बिहार, उत्तर प्रदेशच्या सीमेवर जाऊन रखडले. त्यांना तेथे घोटभर पाणीही मिळत नव्हते. सोनू सूद त्या भुकेल्यांच्या खवळलेल्या गर्दीत पोहचले नाहीत. हे लाखो लोक तेथे पोहोचले ते काय फक्त सोनू सूदने खास व्यवस्था केलेल्या बस, रेल्वेने ? कुणाला मुंबईतून उत्तर प्रदेशात जायचे असेल तर आपल्या मोबाइल नंबरसह एक मेसेज करा. सोनू सूद तुम्हाला घरी पोहोचवेल, असा प्रचार ठरवून झाला. त्या प्रचारासाठी मोठी राजकीय यंत्रणा कामाला लावली गेली. सरकार मजुरांसाठी काही करत नाही, पण सोनू सूद करतोय हे बिंबवण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप राऊतांनी केला.