अमित ठाकरेंचा CM उध्दव ठाकरेंना ‘कॉल’, काकांकडून पुतण्याला मिळालं आश्वासन

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन  –   मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत फोनवरून चर्चा केली आहे. यापूर्वी अमित ठाकरे यांनी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून सगळ्या रुग्णालयांना जोडून एक अ‍ॅप तयार करण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

याबाबत एमपीएससी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी ट्विट करत माहिती दिली. त्यांनी म्हटलं आहे की, अमित ठाकरे यांनी आमच्या सोबत फोनवरून चर्चा करून आमची विचारपूस केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना फोन करून बसेस उपलब्ध करून विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात यावे अशी विनंती केली. उद्धव ठाकरेंनी देखील विद्यार्थ्यांना आश्वासन देत येत्या दोन दिवसात घरी सोडण्यात येईल असं सांगितलं.

दरम्यान, अमित ठाकरेंनी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णांच्या अडचणींची माहिती देणार पत्र लिहलं होत. त्यात त्यांनी सध्याच्या युगात बहुतांश लोकांकडे अँड्रॉइड मोबाईल असल्याने, आपण जर माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सगळ्या रुग्णालयांना जोडून एक अ‍ॅप तयार केल पाहिजे आणि त्यामध्ये असलेल्या कोविड १९ आणि अन्य आजार असणाऱ्या रुग्णांची माहिती तसेच तिथे असणाऱ्या बेड्सची माहिती रोजच्या रोज दिली तर लोकांना ही माहिती मिळणं सोपं होईल. यामुळे सामान्य लोकांना नाहक होणार त्रास होणार नाही, असं अमित ठाकरेंनी या पत्रात म्हटलं होत.