‘बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात महाविकास आघाडीच्या स्वरूपात तीन पक्ष एकत्र आले आणि राज्यातील सत्ता काबीज केली. महाराष्ट्रातील याच बदलत्या परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी आता राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे सरसावली आहे. शिवसेनेने आपल्या हिंदुत्ववादी तत्वांचा विचार न करता कायम विरोधात असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर मैत्री केली आणि यामुळे काही प्रमाणात का होईना मराठी माणूस नाराज झाला आहे असे बोलले जाते. याच पार्श्वभूमीवर आता मनसेनं शिवसैनिकांना साद घातली आहे. बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका, मनसेचा झेंडा हाती घ्या, असं आवाहन मनसेकडून करण्यात येत आहे.

मनसे चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या बाबतीत एक ट्विट केलं आहे. ट्विटच्या माध्यमातून खोपकर यांनी महाविकास आघाडीवर हल्ला केला आहे. खोपकर यांनी या आघाडीला ‘सपक महाखिचडी’ची उपमा दिली आहे. ते म्हणाले की, जे शिवसैनिकांनी पोषक आहारासाठी कष्ट केलेत त्यांच्या वाट्याला सपक महाखिचडी आली आहे. पण सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका… असे त्यांनी ट्विट करून कार्यकर्त्यांना आधार दिला आणि म्हणाले की, ‘निर्लज्जपणे असाच सुरू राहील सत्तेचा खेळ… मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ…’ बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन’से सामील व्हा, असं आवाहन देखील त्यांनी ट्विटमधून शिवसैनिकांना केलं.

शिवसेनेनं भाजपाबरोबरची जुनी मैत्री तोडत काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात धरला आणि राज्यातील सत्तेची समीकरणं बदलली. त्यामुळे शिवसेना आता आपली हिंदुत्वाची आणि मराठीची भूमिका फार जोरकसपणे मांडू शकत नाही. याचाच फायदा मनसे उचलून पक्षाला उभारी देण्यास सज्ज झाला आहे. गोरेगाव येथे मनसेचा मेळावा पार पडणार असून या मेळाव्यात पक्षाची नवीन भूमिका राज ठाकरे मांडणार असल्याचे समजत आहे. विशेष म्हणजे मनसेचा नवा ध्वजही या मेळाव्यातून पुढं आणला जाणार आहे. आता या मेळाव्यात राज ठाकरे हे मराठीचा मुद्दाच पुन्हा लावून धरतात की मग भाजपला सोयीस्कर अशी हिंदुत्वाची भूमिका घेतात याबाबत सगळीकडून तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे खोपकर यांचे ट्विट महत्वाचे मानले जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा –