महाराष्ट्र नवनिर्माण सेना : ‘आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक लढवय्या’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल सोमवारी (दि. 18) जाहीर झाले. निकालानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात आपणच पक्ष एक नंबरचा ठरल्याचे दावे- प्रतिदावे केले जात आहेत. मात्र निकालात मनसेने देखील अनेक ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावत स्वत:कडे लक्ष वेधून घेतले आहे. ग्रामपंचायतीच्या या यशानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक लढवय्या आहे, बचेंगे तो और लढेंगे, असे म्हणत विजयी मनसे पुरस्कृत उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ग्रामपंचायत निवडणूक ताकदीने लढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानुसार मनसेने ग्रामपंचायत निवडणुकीत ताकद लावल्याचे दिसून येत आहे. मनसेने मुंबईजवळची ग्रामपंचायत असो की तिकडे विदर्भ, आपल अस्तित्व दाखवून दिले आहे. बाळा नांदगांवकर फेसबुकद्वारे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल स्पष्ट झालेत. खरे तर ग्रामपंचायत ही सहसा पक्षपातळीवर न लढता स्थानिक पॅनेलद्वारे लढली जाते. निकाल आल्यापासून सर्व जण मोठ्या यशाचे व इतर ही अनेक दावे करत आहेत. आपण या कोणत्याच भानगडीत न पडता पुढे जाऊ या. आपल्या पक्षाला मिळालेले यश हे निश्चितच आशादायक आहे.पक्षाच्या सर्व विजयी उमेदवारांचे तसेच प्रत्यक्षात मैदानात उतरून लढा दिलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे व राज्यातील सर्व जनतेचेही मनापासून आभार व हार्दिक अभिनंदन, असे नांदगावकर यांनी म्हटले आहे.

मनसेने एकट्या यवतमाळमध्ये 15 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. बुलढाण्यात जिगाव ग्रामपंचायतीवर असलेली शिवसेनेची 25 वर्षाची सत्ता उलथवून मनसेने विजय पटकावला आहे. उस्मानाबादमध्ये जळकोटमध्ये जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनीही विजय मिळवला आहे. औरंगाबादच्या रेणापूरमध्ये मनसेने 7 पैकी 6 जागा जिंकल्या आहेत. रायगडच्या जोहे येथे मनसेचा 1 उमेदवार जिंकला आहे. जुन्नरच्या खिल्लारवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने झेंडा फडकवला आहे. अमरावतीतील अचलपूर तालुक्यात खैरी सावंगी वाढोवा ग्रामपंचात, मनसेने रत्नागिरीच्या नवशी ग्रामपंचायत, तसेच बीडच्या केज तालुक्यातील नारेवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने वर्चस्व मिळवले आहे. अजूनही राज्यात ठिकठिकाणी मनसेप्रणित आघाडीचे उमेदवार जिंकल्याची माहिती आहे.