‘कोरोना’च्या कॉलर ट्यूनवर भडकले मनसे नेता

पोलीसनामा ऑनलाईन टीम  – कोरोनाच्या जनजागृतीसाठी कंपन्यांनी मोबाईल फोनवर कॉलर ट्यून सुरू केली आहे. पण आता या कॉलर ट्यूनला अक्षरश: सगळेजण वैतागले आहेत. सामान्य नागरिकच नाही तर राजकीय मंडळीदेखील या कॉलर ट्यूनला वैतागले असून ही ट्यून बंद करा अशी मागणी केली जात आहे. प्रकाश आंबेडकरांनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीदेखील ही कॉलर ट्यून तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे.

कोरोनाच्या संकटात जनजागृती करण्यासाठी ही कॉलर ट्यून सगळ्यांच्या फोनवर चालू करण्यात आली होती. पण आता कोरोनासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती झाली आहे. त्यामुळे आता इतर जाहिरातींच्या माध्यमातून जागृती करा असे ट्वीट नांदगावकर यांनी केले आहे. दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बर्‍यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यून मुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असलेतरी विलंब होतो अथवा लागत नाही,’ असे ट्वीट त्यांनी केले आहे. जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.