‘आम्हाला सुपारी घेणारे म्हणता; मग तुम्ही काय हफ्ते घेणारे आहात का ?, मनसेची शिवसेनेवर बोचरी टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ( BJP) कंबर कसून तयारीला लागला आहे, तसेच शिवसेनेकडून ( Shivsena) मिशन मुंबई ( Mumbai) हाती घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून ( Uddhav Thackery) मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत त्यांनी शिवसैनिकांना महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. तसेच दुसरीकडे भाजप आणि मनसे एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यादरम्यान मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही, त्यामुळे कोणाची तरी सुपारी त्यांना घ्यावीच लागेल, अशी टीका शिवसेनेचे नेते व परिवहनमंत्री अनिल परब ( Anil Parab) यांच्याकडून करण्यात आली आहे. अनिल परब यांच्या या टीकेला मनसेकडून चांगलेच प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

मनसे ( MNS) नेते बाळा नांदगावकर ( Bala Nandgaonkar) यांनी अनिल परब यांच्या टीकेला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, मग तुम्ही काय हप्ता घेणारे आहात का, असा सवाल बाळा नांदगावकर यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. आणि तसा पण अनिल परब आणि माझा प्रवास सारखाच झाला आहे, त्यामुळे कोण काय करतं हे मला चांगलच ठाऊक आहे. जाऊन केबलवाल्यांना विचारून घ्या, मग कळेल.” अशा प्रकारची टीका बाळा नांदगावकर यांनी अनिल परब यांच्यावर केली आहे. तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करायची की नाही, याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतील. पक्षप्रमुखांनी एखादा निर्णय घेतला तर आमच्याकडून त्याचं स्वागतच करण्यात येते. पण सध्या तरी एकला चलो रे अशीच आमची भूमिका असल्याचं मत बाळा नांदगावकर यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे. त्यापूर्वी अनिल परब यांच्याकडून भाजप-मनसे संभाव्य युतीवर भाष्य करताना मनसेवर बोचरी टीका करण्यात आली.

अनिल परब म्हणाले होते की, मुंबई महापालिकेत बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे माहिती नाही; पण मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही. त्यामुळे मनसेला कोणाची तरी सुपारी घ्यावीच लागेल. सुपारीवरच मनसेचं सगळं काही चालू आहे. मनसेकडून आतापर्यंत विविध पक्षांची सुपारी घेण्यात आली आहे. ज्या भाजप नेत्यांना लोकसभेत लाव रे तो व्हिडिओ माध्यमातून उघडंनागडं केलं, त्यामुळे आता नागड्यासोबत उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ही कदाचित पुढे दिसून येईल, मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना जिंकेल, असा विश्वास अनिल परब यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आम्ही शिवसेनेसारखं लग्न एकाबरोबर आणि लफडं दुसऱ्यासोबत केलं नाही : संदीप देशपांडे मनसेकडून जे काही करण्यात आले आहे ते उघडपणे करण्यात आले आहे. आम्ही पोटात एक ओठात एक असं काही केलेलं नाही. २०१९ च्या निवडणुकीत आम्हाला जी भूमिका देशहिताची वाटली ती आम्ही देशासमोर मांडली, असं संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच ते पुढे म्हणाले, आम्ही शिवसेनेसारखं लग्न एकाबरोबर आणि लफडं दुसऱ्यासोबत केलं नाही. तसेच शिवसेनेकडून मराठी आणि हिंदू लोकांसोबत दगाबाजी करण्यात आली आहे. यामुळे आताची शिवसेना ही दगाबाज शिवसेना असल्याचे सांगत संदीप देशपांडे यांच्याकडून शिवसेनेवर निशाणा साधण्यात आला आहे.

You might also like