बाळा नांदगावकरांनी CM ठाकरेंवर केलेल्या टीकेला ‘या’ नेत्याचे सडेतोड उत्तर

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेला परतीचा पाऊस आणि वदळी अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात दाणादाण उडाल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रखर टीका केली. मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ‘Online’ बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरीत आर्थिक मदत द्या. अन्यथा लोकांचा ‘ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल, असे ट्विट नांदगावकर यांनी केलं होतं.

बाळा नांदगावकर यांच्या टीकेला राज्याचे कृषीमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, मी राज्यभर दौरे करुन शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या जाणून घेतल्या. एक ते दीड महिन्यांच्या कालावधीत कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सहा वेळा बैठका घेतल्या आहेत, अशा शब्दांत दादा भुसे यांनी बाळा नांदगावकर यांना उत्तर दिलं आहे.

दरम्यान, परतीच्या पावसानं राज्याला दिलेल्या तडाख्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिके आडवी झाली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडण्याचे आवाहन केलं आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जालना जिल्ह्यातील अशाच एका शेतकऱ्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये पाण्यानं भरलेलं शेत दिसत आहे. त्यात पिके वाहून गेली असून सगळी मेहनत पाण्यात गेल्याचे पाहून हादरलेला शेतकरी चिखलात लोळताना दिसत आहे.