रास्त मागणी ! ‘कोरोना’ रुग्णसंख्येच्या माहितीसाठी मेडिकल ‘बुलेटिन’ जारी करा : मनसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारमधील जबाबदार मंत्री किंवा अधिकाऱ्याने दररोज संध्याकाळी एक ‘मेडिकल बुलेटिन’च्या माध्यमातून जनतेसमोर येऊन अधिकृत माहिती लोकांपर्यंत पोहचवावी, अशी मागणी मनसेचे माजी आमदार व नेते नितीन सरदेसाई यांनी ठाकरे सरकारकडे केली आहे. याविषयी एक पत्रकच त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलं आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या यामुळे राज्यातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याची संख्या मोठी आहे. पण, समाजमाध्यमांतून प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळं नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. सरकारकडूनही जनतेपर्यंत अचूक माहिती पोहोचत नसल्यानं त्यात भर पडत आहे. त्यामुळे दररोज संध्याकाळी एक ‘मेडिकल बुलेटिन’च्या माध्यमातून जनतेसमोर अधिकृत माहिती पोहचवावी.

जेणेकरून नागरिकांच्या मनातील भीती दूर होईल, असं पत्रक नितीन सरदेसाई यांनी प्रसारित केलं आहे. तसेच राज्यात आत्ताच्या घडीला कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्ण संख्येबरोबर गंभीर आजारी असणाऱ्या व दगावलेल्या रुग्णांची संख्यादेखील सांगावी. राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही जनतेसमोर येणं तितकंच आवश्यक असल्याचे नितीन सरदेसाई यांनी म्हटले आहे.