मनसेच्या नेत्या ॲड. रुपाली पाटील यांच्यावरील स्थानबद्धतेची कारवाई न्यायालयाने फेटाळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात नव्याने उभारण्यात आलेल्या जंम्बो हॉस्पिटल मधील अनागोंदी कारभाराविरोधात आंदोलन केल्याने शिवाजीनगर पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्ष रुपाली ठोंबरे पाटील यांना अटक करुन केलेली स्थानबद्धतेची कारवाई न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

सीओईपी मैदानावर कोरोना रुग्णांसाठी बांधण्यात आलेल्या जंम्बो सेंटरच्या कारभाराविरोधात रुपाली ठोंबरे पाटील यांनी 5 सप्टेंबर रोजी आंदोलन केले होते. त्यावेळी रुपाली पाटील या गेटवर चढून आत गेल्या होत्या. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले. त्यांच्यावर यापूर्वी खडक, विश्रामबाग, हिंजवडी, बिबवेवाडी, डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शरीराविरुद्ध व दंगा मारामारीचे गुन्हे दाखल असून त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांच्यमध्ये काहीही सुधारणा झाली नाही.

रुपाली पाटील यांच्याकडून यापुढे अशा प्रकारचे कृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होण्याची दाट शक्यता वाटत असल्याने त्यांना 8 ते 21 सप्टेंबर पर्यंत 14 दिवस स्थानबद्ध करण्याबाबत आदेश देण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली. राजकीय कार्यकर्त्यांवर गुंडाविरोधात करायची कारवाई केल्याने त्याचा सोशल मीडियावर निषेध होऊ लागला होता. यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. राणे यांनी पोलिसांची कारवाई फेटाळून लावली आहे.

रुपाली पाटील यांच्याविरुद्ध अशाप्रकारचे गुन्हे यापूर्वी दाखल झाले असले तरी त्यासाठी सीआर पीसी 151 (3) ची कारवाई करणे योग्य होणार नाही. यापुढे अशा प्रकारे गुन्हे करणार नाही, असे हमीवर त्यांची न्यायालयाने सुटका केली. रुपाली पाटील यांच्यावतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी काम पाहिले.

यावर बोलताना रुपाली पाटील म्हणाल्या, जंम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मृत्यू होत आहेत. एका पत्रकाराला आपला जीव गमवावा लागला आहे. अशावेळी प्रशासनाला जाब विचारणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार पोलिसांमार्फत करत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो, असे त्या म्हणाल्या.