‘कुणाला मंत्रालयात जायचा कंटाळा आलाय म्हणून Lockdown वाढवता येणार नाही’, मनसेकडून टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकं कंटाळली आहेत हे मान्य आहे परंतु लोकांचा कंटाळा घालवण्यासाठी आपण अनलॉक करत नाही. लोकांचा पोटापाण्याचा प्रश्नही निर्माण होतोय हे देखील मान्य आहे. पण जर आपण एकदम लॉकडाऊन उठवला आणि अचानक साथ वाढली, त्यात लोकांचे जीव गेले तर पोटापाण्याचा प्रश्नाचं काय करणार ? असं सामनाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यावरून आता विरोधकांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होत आहे. मनसेने उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, कोणाला कंटाळा आला असेल म्हणून लॉकडाऊन काढता येणार नाही असं मुख्यमंत्री म्हणतात. याच्याशी 100 टक्के मी सहमत आहे. परंतु कोणाला मंत्रालयात जायचा कंटाळा आलाय म्हणून लॉकडाऊन वाढवताही येणार नाही असं महाराष्ट्राची जनता म्हणत आहे, असं संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवरून सडकून टीका केली. चार महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली आहे. त्यामुळे मॅच फिक्सिंग हे इथे आलेच आहे. कोरोनाच्या परिस्थितीनंतर उद्धव ठाकरे हे माध्यमांसमोर आले आहेत. मुळात संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतिपाठक आहेत. त्यामुळे हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे.