मनसेचा ठाकरे सरकारला ‘रोकडा’ सवाल, म्हणाले – ‘पोलिसांना 100 कोटी, तर मग BMC ला किती टार्गेट असेल?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. पोलिसांना 100 कोटीचे टार्गेट दिले होते, तर मग मुंबई महापालिकेला कितीचं टार्गेट दिले असेल, असा रोकडा सवाल देशपांडे यांनी केला आहे. तसेच हीच ती वेळ आहे विरप्पन गॅंगला कायमच क्वारंन्टाईन करण्याची असेही देशपांडे यांनी म्हटले आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई पोलिसांना 100 कोटीचं टार्गेट असेल, तर महापालिकेला किती अशी विचारणा केली आहे. दरम्यान पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.