परप्रांतीयांचे लोंढे थांबवण्यासाठी ‘मनसे’नं HM अमित शहांकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (NRC) प्रमाणेच स्टेट रजिस्टर ऑफ सिटीझन (SRC) संपूर्ण देशात लागू करण्यात यावा अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी केली आहे. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन हे सर्वप्रथम आसाममध्ये लागू करण्यात आलं होतं. यानुसार, 24 मार्च 1971 पर्यंत नोंद असणाऱ्या नागरिकांनाच भारताचे नागरिकत्व लागू राहिल.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घोषणा केली होती की, आसामप्रमाणे एनआरसी कायदा देशात लागू केला जाईल. याच पार्श्वभूमीवर संदीप देशपांडेंनी ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “NRC प्रमाणेच SRC म्हणजेच…. State Register of Citizens देखील संपूर्ण देशात लागू झाले पाहिजे. त्यामुळे एखाद्या राज्यात परराज्यातून येणाऱ्या लोंढ्याना निर्बंध बसेल. स्थानिक/भूमिपुत्रांना न्याय मिळेल….”

संपूर्ण देशभर राष्ट्रीय नागरिक नोंदणी उपक्रम (NRC) राबवणार अशी मोठी घोषणा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तिसऱ्या दिवशी अमित शहांनी केली होती. राज्यसभेत एनआरसीवर चर्चा सुरु असताना त्यांनी ही घोषणा केली होती.

एनआरसी बाबत राज्यसभेत माहिती देताना अमित शहा म्हणाले, “धर्मधारित नागरिक नोंदणी करणं या एनआरसी मध्ये अपेक्षित नाही. ज्यावेळी देशभर एनआरसी करण्यात येईल त्यावेळी पुन्हा एकदा आसाममध्ये ही प्रक्रिया होईल. कोणत्याही धर्माच्या नागरिकांना एनआरसी पासून धोका नाही. त्यामुळे कोणीही या प्रक्रियेला घाबरून जाऊ नये. सर्व समूहांना एनआरसी अंतर्गत सामावून घेतलं जाईल अशी व्यवस्था आहे.” असं शहा म्हणाले.

Visit : policenama.com