‘बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेना खंडणी घेतेय’, मनसेचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   बाळासाहेबांचे फोटो लावून खंडणी घेतली जाते, असा गंभीर आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि भांडुपमधील स्थानिक आमदार सुनील राऊत यांचा फोटो लावून फेरीवाल्यांकडून खंडणी वसूल करण्यात येते, असेही त्यांनी सांगितलं. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संदीप देशपांडे म्हणाले, बाळासाहेबांचे फोटो लावून हे कृत्य करणे दुर्दैवी आहे. रोज १० रुपये घेतले जातात आणि या फेरीवाल्यांना संरक्षण दिले जाते. त्याचा कट मुख्यमंत्र्यांपर्यंत जातो. पोलीस महानगरपालिका अधिकारी यांना आम्ही सांभाळू असे सांगत पैसे घेतात. सार्वजनिक पदपथांचा वापर करताना होणार उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मूलनासाठी घेण्यात येणारा कर, असा उल्लेख शिवसेनेकडून देण्यात येणाऱ्या पावत्यांवर असल्याचे त्यांनी म्हटलं.

सरकारकडे हफ्ते पोहचत नसतील तर सरकार कारवाई करेल, असा टोला शिवसेनेला लगावत, आम्ही या सगळ्या प्रकरणाची पोलिसांत तक्रार करणार आहोत. वीरपन्नने जेवढ देशाला लुटले नसेल तेवढं मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी लुटले आहे. यांचा एन्काऊंटर करावा लागेल. मुंबई खंडणीखोरांच्या ताब्यात आहे ती काढून घेतली पाहिजे, असेही संदीप देशपांडे यांनी यावेळी सांगितलं.