मनसे नेत्याचा सवाल, म्हणाले – ‘वरळीत मध्यरात्रीनंतरही दिशा पटानीच्या चित्रपटाच्या शुटींगला परवानगी कशी ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आमदार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वऱळी मतदारसंघात भरवस्तीमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत रात्री उशिरापर्यंत अभिनेत्री दिशा पटानी आणि जॉन अब्राहीम यांच्या चित्रपटाच्या शुटींगला परवानगी दिल्याचा आरोप मनसेने केला आहे. याला युवराजांचा आशिर्वाद होता की महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा ? असा सवाल मनसेने केला आहे. मनसेचे वरळी विधानसभा अध्यक्ष संतोष धुरी यांनी केम छो वरळीचे मराठी सत्य’ अशा मथळ्याखाली फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ‘युवराजांची दिशा चुकली’ असा उल्लेख करुन आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. असे असताना आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात वरळीतील कोळीवाड्यामध्ये शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत दिशा पटानी आणि जॉन अब्राहीम यांच्या चित्रपटाचे शुटिंग सुरु होते, असा दावा धुरी यांनी केला आहे. सिनेमाच्या शुटिंगसाठी कुणाची परवानगी होती? असा सवाल उपस्थित करत सामान्यांना एक न्याय आणि सेलिब्रिटींनी एक न्याय. या ठिकाणी बघ्यांचीही गर्दी झाली. सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला होता असे धुरी यांनी म्हटले आहे पबसंदर्भातील प्रकार उघडकीस आल्यानंतरही महापालिका अधिकारी अशाप्रकारची परवानगी देत असतील तर हे निंदनीय आहे, असा टोलाही धुरी यांनी लगावला आहे.