सरकार मासिक पाळीची बातमी ट्रम्प यांच्यापर्यंत पोहचू नये यासाठी कोणती नवी ‘भिंत’ उभारणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ट्रम्प गुजरात दौऱ्यावर जाणार आहे. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी गुजरात सरकारने तब्बल 100 कोटी पेक्षा जास्त रुपयांचा खर्च केला आहे. ट्रम्प आणि मोदी यांचा यावेळी रोड शो होणार आहे. रोड शो दरम्यान मार्गातील झोपड्या ट्रम्प यांना दिसू नयेत यासाठी भिंत बांधण्यात येत आहे. अहमदाबाद पालिकेच्या या भूमिकेवरुन विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

यावरून मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आपण फक्त भिंती उभारणार आहोत की, विषमतेच्या या भिंती पाडण्यासाठी प्रयत्न पण करणार आहोत असा सवाल शालिनी ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या रोड शो दरम्यान अहमदाबादमधील गरीब भागातील झोपड्या दिसू नये यासाठी भिंती उभारण्यावरून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, गुजरातच्या एसएसजीआय या हॉस्टेलमध्ये 68 विद्यार्थीनींना मासिक पाळीत कोण आहे याची तपासणी करण्यासाठी चक्क त्यांना कपडे काढायला बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरून शालिनी ठाकरे यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना गरीबांच्या झोपड्या दिसू नये म्हणून भिंत उभारणारं सरकार, मासिक पाळीची ही बातमी ट्रम्प यांच्यापर्यंत पोहचू नये यासाठी आणखी कोणती नवी भिंत उभारण्याचा विचार सरकार करत आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. शालिनी ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करून हा सवाल उपस्थित केला आहे.

शालिनी ठाकरे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूटमधल्या मुलींच्या वसतीगृहातील 68 मुलींना मासिक पाळी आली का, हे तपासून पाहण्यासाठी त्यांच्या शिक्षिकांनी त्यांना नग्न करुन तपासणी केली. कारण काय तर म्हणे, मासिक पाळी असतानाही काही मुली वसतीगृहाच्या स्वयंपाकघरात जातात, मंदिराच्या आसपास फिरतात आणि इतरांना स्पर्श करतात, अशी तक्रार तिथल्या वॉर्डनने केली. अशा प्रकारची घटना इतरही ठिकाणी घडत असतात. पण दुर्दैवाने त्या उघडकीस येत नाहीत. त्यामुळे दोषींवर कारवाईच होत नाही. महिलांचा – विद्यार्थिनींचा अपमान होण काही थांबत नाही.