राज्यभरातील ‘मनसे’ कार्यकर्ते मुंबईकडे मोर्चासाठी रवाना, बसगाड्यांवर भाजपच्या एका आमदाराचं नाव ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पाकिस्तानी, बांगला देशी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याच्या मागणीसाठी नवनिर्माण सेना आज (रविवार) मुंबईत मोर्चा काढत आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातून मनसे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. नाशिक, नगर तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते बसने मुंबईकडे रवाना झालेले दिसून येत आहे.

पुण्यातून सुमारे १०० बसमधून मनसैनिक सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मनसेचा नवीन झेंडा लावलेल्या गाड्या मुंबईकडे रवाना होत असल्याचे एक्सप्रेस वेवर दिसत आहे. मनसेच्या मुंबईतील मोचार्साठी पुण्यातील मनसे कार्यकर्ते निघण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी डेक्कन भागातील नदीपात्रात बसेसची सोय करण्यात आलीय. त्यापैकी काही बसेसवर भाजपच्या आमदाराचं नाव आहे.

मुंबईतील हिंदु जिमखाना येथून दुपारी १२ वाजता मनसेच्या महामोर्चाला सुरुवात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हिंदु जिमखाना येथून हा मोर्चा आझाद मैदानावर जाणार आहे. आझाद मैदान येथे राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. सभेसाठी आझाद मैदानात मोठी तयारी करण्यात आली असून मनसेच्या नवीन शिवमुद्रा असलेले झेंडे सर्वत्र लावण्यात आले आहेत. नागरिकत्व कायदा दुरुस्ती आणि राष्ट्रीय नागरिक सूची वरुन देशभरात वादंग सुरु असताना राज ठाकरे यांनी बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची भूमिका घेतली आहे.

शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी टिका होऊ लागली आहे. त्यामुळे पक्षाला उभारी देण्यासाठी मनसेने हिंदुत्वाची कास धरली आहे. त्यामुळे एका बाजूला केंद्र सरकारच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका घेत नाराजांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी राज ठाकरे यांनी ही भूमिका घेतली असल्याचे सांगितले जात आहे. या महामोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो व राज ठाकरे सभेत नेमकी काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.