Mumbai News : मनसेने वरळीत सुरु केली ‘पेंग्विन गेम्स’ Web Series

पोलीसनामा ऑनलाईन : सध्याचा जमाना वेसीरिजचा आहे. आता राजकीय पक्ष यापासून दूर राहिले नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS ) ‘पेंग्विन गेम्स’ या नावाखाली एक वेब सीरिज सुरु केली आहे. वरळीतील सर्वसामान्यांच्या समस्या मांडण्यासाठी मनसेने (MNS ) ही वेब सीरिज सुरु केली आहे. दर पंधरा दिवसांनी या वेब सीरिजचा एक भाग प्रदर्शित केला जाणार आहे. याचे प्रसारण सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जाणार आहे. वरळी हा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ आहे.

फेसबुकवर सुरू केलेल्या या वेब सीरिजच्या पहिल्या भागात वरळी भागात असलेल्या प्रेम नगर येथील पाणी प्रश्न आणि सॅनिटायझेनची बिकट अवस्था मांडण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक आमदार आणि सत्ताधारी पक्ष हे केवळ वरवरच्या मुद्द्यांवरच लक्ष देत असल्याचे दिसून येत असल्याचे मत मनसेचे संतोष धुरी यांनी व्यक्त केले आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

वरळी मतदार संघात एकीकडे शिवसेनेकडून वरळीमध्ये A+ कॅम्पेन चालवले जात आहे. त्यात स्ट्रीट आर्ट, एलईडी सिग्नल, रस्त्यांचे सौदर्यीकरण आदी गोष्टी या ठिकाणी राबवल्या जात आहेत. अशातच मनसेने सामान्यांच्या समस्या मांडण्यासाठी पेंग्विन गेम्स ही वेब सीरिज सुरू केली आहे. प्रेम नगरच्या रहिवाशांकडून आम्हाला उत्तम प्रतिसादही मिळाला आहे. शौचलांना दरवाजे नसणे, पाणी प्रश्न असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत, असे धुरी म्हणाले. 2019 मध्ये राज्यात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये या ठिकाणाहून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना विजय मिळाला होता.