राज ठाकरेंनी मुलावर टाकला ‘विश्वास’, अमित यांच्याकडे सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षात काही बदल केले असून मुलगा अमित ठाकरे यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. आगामी निवडणुकांसाठी अमित ठाकरे यांच्यावर उत्तर-पूर्व भागातील जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अमित यांच्यासोबत संदीप देशपांडे हे सुद्धा असणार आहे. तर दक्षिण मुंबईची जबाबदारी नितीन सरदेसाई आणि मनोज चव्हाण यांना दिली आहे.

मुंबईत मनसेच्या नेते आणि पदाधिका-यांची बुधवारी (दि. 3) महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना आणि नव्याने बांधणी याबद्दलही चर्चा झाली आहे. तसेच मुंबई निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकसभानिहाय 1 नेता आणि 1 सरचिटणीस अशी टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम त्या लोकसभा मतदारसंघात जाऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्याचा अहवाल राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली. आपल्या भागातला अहवाल ही टीम 25 फेब्रुवारीपर्यंत राज ठाकरे यांना देणार आहे. तसेच मुंबई बाहेर ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण डोंबिवली यासाठी देखील लवकरच टीम तयार केली जाणार आहे.