मनसे आमदाराकडून प्रथमच शिवसेनेच्या बड्या नेत्यावर ‘कडाडून’ टीका

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – डोंबिवली मधील २७ गावांची स्वतंत्र महापालिका तयार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुकूल आहेत, पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची नियत या विचारासाठी साफ दिसत नाही. अशी टीका मनसेचे कल्याण ग्रामीण चे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

आज आमदार राजू पाटील यांनी डोंबिवलीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या गुलाबी रस्त्याची पाहणी करायला आले होते. त्यावेळी २७ गावांतील लोकांच्या भावना त्यांनी जाणल्या होत्या आणि लोकांच्या भावना असतील तर २७ गावांसाठी महापालिका निर्माण करण्यासंदर्भातील निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्र्यांना त्यावेळी दिले होते. यावरून मुख्यमंत्र्यांची नियत साफ दिसत आहे पण, नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री यांची नियत साफ नसल्याची टीका राजू पाटलांनी यावेळी केली.

नवीन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे चांगले काम करत आहेत. नागरिकांच्या हिताची कामे करण्यासाठी प्रत्येक वेळी निधीची आवश्यकता नसते तर, प्रशासकीय इच्छेवर सुद्धा ते अवलंबून असते. २७ गावांची स्वतंत्र महापालिका निर्माण करण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले.