राम मंदिराच्या उभारणीसाठी ‘मनसे’ आमदाराकडून 2.5 लाखांची मदत

पोलीसनामा ऑनलाईन टीम : विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे. देशाच्या विविध भागातून राम मंदिर बांधण्यासाठी लोक देणगी देत आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी गोळा करण्याच्या मोहिमेला जोरदार सुरुवात झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनीही अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी दिली आहे.

राजू पाटील यांनी राम मंदिरासाठी २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला आहे. राम मंदिर उभारण्याच्या या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले, असे म्हणात राजू पाटील यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबतची माहिती दिली आहे.

राजू पाटील ट्विटरवर म्हणाले “आज जगभरातील सकल हिंदू समाज एकवटून अयोध्येतील ‘श्रीराम मंदिर निर्माण निधी’ संकलन करून यथाशक्ती योगदान देत आहे. काल मला पण या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले. गणेश मंदिर ट्रस्टी अच्युत कराडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कल्याण जिल्हाप्रमुख अण्णा गाणार, संघ कार्यकर्ते उदय कुलकर्णी, सुरेश फाटक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला आणि प्रभू श्रीराम मंदिराची छोटी प्रतिकृती भेट दिली. ”

… या दिग्गजांनी दिल्या देणग्या
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अनेक दिग्गजांनी देणग्या दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाच लाखांचा धनादेश दिला आहे. तर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी १ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला पाठविला आहे. याचबरोबर, भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्याकडून राम मंदिरासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे.

या मोहिमेमध्ये मुस्लीम देखील मागे राहीलेले नाहीत. अयोध्येच्या पवित्र नगरीला धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतिक बनविण्यासाठी वासी हैदर यांच्याकडून १२ हजार, तर शाह बानो यांच्याकडून ११ हजार रुपयांची वर्गणी देण्यात आली आहे. बाबरी मशिदीच्या ऐतिहासिक निकालानंतर या बाबरीची बाजू लढवणारे वकील इक्बाल अन्सारी यांनीही राम मंदिराच्या उभारणीसाठीच्या महाअभियानाचे स्वागत केले होते. “राम मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लिमांनी पुढाकार घेऊन दान केले तर नक्कीच हे दोन्ही धर्मातील एकोपा वाढविण्याचे संपूर्ण देशात प्रतिक ठरेल”, असे अन्सारी म्हणाले होते.