मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आता ‘यू- टर्न नको, हिच ती वेळ’ म्हणत मुख्यमंत्र्यांकडे बुलेट ट्रेन प्रकल्प गुंडाळण्याची मागणी केली आहे. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारला द्यावा लागणारा हिस्सा व त्यासाठी बीकेसी व इतर ठिकाणी भूसंपादीत करायला लागणाऱ्या हजारो कोटी राज्याच्या इतर लोकोपयोगी कामांसाठी वापरण्याची विनंती पाटील यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोखणार बुलेट ट्रेन? –

सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘आरे’मधल्या मेट्रोच्या कारशेड बांधकामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ असलेल्या बुलेट ट्रेनबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी –

बुलेट ट्रेन प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक मानला जातो. अहमदाबाद आणि मुंबई शहरादरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा 2015 मध्ये करण्यात आली. जपानच्या मदतीने ही ट्रेन तयार केली जात आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत आधी 2022 ठरवण्यात आली होती, पण आता ती 2023 पर्यंत पुढे गेली आहे. या प्रकल्पाचं काम अधिकृतरीत्या सप्टेंबर 2017 मध्ये सुरू करण्यात आलं.

Visit : Policenama.com