भाजपसोबतच्या युतीबाबत मनसेचे आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील बदलेल्या राजकीय समिकरणानंतर मनसेने आपल्या पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या गुप्त बैठकीनंतर मनसे-भाजप भविष्यात एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षापुढे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत भाजप सोबत युतीचे संकेत दिले. तसेच मनसेचे संदीप देशपांडे यांनी देखील राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती भाजपवर नाही असे मत व्यक्त केले होते.

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आले. त्यातच या दोन नेत्यांच्या भेटीनंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी देखील मनसे-भाजप एकत्र येऊ शकतात असे मत व्यक्त केले आहे. राजू पाटील म्हणाले, सभागृहातील सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात मनसे आणि भाजपमध्ये युती होऊ शकते. परंतु राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली याची कल्पना नसल्याचे देखील राजू पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट ही राजकीय नाही तर सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, भविष्यात काहीही घडू शकते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. राज्यातील सत्ता समिकरणं पाहता कालपर्यंत शिवसेना काँग्रेससोबत जाईल का असं कोणी म्हटलं तर वेडं म्हटलं असतं. पण शेवटी ते एकत्र झालेच.

येत्या 23 जानेवारीला मनसेचे महाअधिवेशन असून या अधिवेशनात राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकत्व कायद्यावरून राज्यात जे आंदोलन सुरु आहे. नवीन सरकारची कामगिरी या सर्व विषयावर राज ठाकरे बोलणार असल्याची शक्यता आहे. आजपर्यंतच्या भाषणात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे येत्या 23 तारखेला राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/