MIDC तील प्रदूषणाच्या समस्येने नागरिक त्रस्त; अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय काही होणार नाही का ? : मनसे

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन – येथील एमआयडीसीतील प्रदूषणाच्या समस्येपासून नागरिक त्रस्त आहेत. यावरून अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय काही होणार नाही का?, अशी विचारणा करत कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारवर शरसंधान साधले आहे.

डोंबिवली परिसरातील एमआयडीसीच्या प्रदूषणाचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. याबाबत सातत्याने तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. त्यावरून राजू पाटील यांनी एक ट्विट केले आहे. “या प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय काही होणार नाही का?,” असा सवाल त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला आहे.

डोंबिवली एमआयडीसीतील कारखान्यांमधून रस्त्यांवर निळे पाणी सोडण्यात येते. त्यामुळे येथील रस्ते निळे पडू लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याकडे एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रक महामंडळाच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राजू पाटील यांनी केला.

त्याचसोबत या रसायनमिश्रित पाण्याने गंभीर आजार उद्भवण्याचा धोका असून, येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. यासंदर्भातच राजू पाटील यांनी ट्विट करत उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे.