‘ही’ लढाई आहे ! मनसेच्या महामोर्चाची ‘जबरदस्त’ तयारी, पहिला ‘टिझर’ आला समोर (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसे येत्या 9 फेब्रुवारीला मुंबईत महामोर्चा काढणार आहे. मनसेने या मोर्चासाठी जय्यत तयारी केली आहे. महामोर्चात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करणारे होर्डिंग्स संपूर्ण मुंबईत झळकत आहेत. एवढेच नाही तर मनसेने वातावरण निर्मितीसाठी महामोर्चाचा पहिला टिझर आज (बुधवार) रिलीज केला आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महामोर्चा काढणार असल्याचे 23 जानेवारी रोजी झालेल्या महाअधिवेशनात जाहीर केले होते. त्यानुसार मनसेचा हा मोर्चा 9 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता निघणार आहे. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या नव्या मार्गावरून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यापूर्वी हा मोर्चा मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून आझाद मैदानापर्यंत निघणार होता. मात्र, मुंबई पोलिसांनी या मार्गावरून मोर्चा काढण्यास परवानगी नाकारल्याने आता नव्या मार्गाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावर रविवारी (दि.9) मनसे महामोर्चातून शक्तिप्रदर्शन करणार आहे. आझाद मैदान येथे पोलिसांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी ऑगस्ट 2012 मध्ये राज ठाकरे यांनी याच मार्गावरून मोर्चा काढला होता. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी राज ठाकरे मुंबईच्या रस्त्यावर पक्षातर्फे काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

पोस्टरच्या माध्यमातून घुसघोरांना इशारा
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे संपूर्ण मुंबईत पोस्टर्स लावण्यात आले आहेत. मुंबईतील वर्सोवा भागात मनसेच्या वतीने बांगलादेशी घुसखोरांना इशारा देणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. घुसखोरांना ‘मनसे’ इशारा, तुमच्या देशात निघून जा असे या पोस्टरवर मराठीत लिहण्यात आले आहे. या पोस्टरवर वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई आणि उपविभाग अध्यक्ष अशोक पाटील यांची नावे छापण्यात आली आहेत.