‘मनसे’चा महामोर्चा भाजपा ‘पुरस्कृत’, शिवसेनेची राज ठाकरेंवर ‘जहरी’ टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी आणि सर्वधर्म समभावाकडून प्रखर हिंदूत्वाची वाट धरणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चा काढणार आहे. मनसेच्या या भूमिकेवर शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी जोरदार हल्ला केला आहे. मनसेचा हा मोर्चा भाजपा पुरस्कृत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या मोर्चामुळे शिवसेनेला कोणताही फटका बसणार नाही, असेही कायंदे यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीशी आमदार मनिषा कायंदे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मनसेची भूमिका सतत बदलणारी आहे. या मोर्चामागे भाजपाचाच हात आहे. काही दिवसांपूर्वी शहा-मोदी यांना राजकीय पटलावरुन बाजूला फेका, असा टोकाचा विरोध करणारे आता मवाळ झाले आहेत, हे लोकांना दिसत आहे. भाजपाला महाराष्ट्रात कधीच स्वबळावर सत्ता आणता आली नाही, त्यांना दुसर्‍या पक्षाच्या कुबड्या कायम लागतात. अगोदर वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न केला आता मनसेला घेत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचेच मुद्दे मनसे पुढे घेऊन जात आहे, पाकिस्तानी, बांग्लादेशी हे मुद्दे आत्ताच का आठवले? गेली 14 वर्ष मनसे कुठे होती? असे सवाल कायंदे यांनी उपस्थित केले.

कायंदे म्हणाल्या, भाजपाचे आशिष शेलार वारंवार कृष्णकुंजवर जात आहेत. त्यानंतर हा मोर्चा निघतो, या मोर्चामागे भाजपाचा हात असण्याची शक्यता आहे. मराठी कार्ड मनसेचे कधीही नव्हते. पक्षस्थापनेवेळी त्यांनी हा मुद्दा घेतला, त्यातही सातत्य नव्हते.  हिंदुत्वाचा मुद्दा मनसेने कधीही आणला नव्हता, भगवी वस्त्र घातल्याने कोणी हिंदुत्व घेतले असे होत नाही. लोकांनी भाषणात टाळ्या वाजवल्या, मनोरंजन केले पण लोकांना आता कळले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीतही याचा परिणाम होणार नाही. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली, कॉमन मिनिमम प्रोग्रामद्वारे हे सरकार सुरु आहे. लोकांना हे सरकार आवडले आहे. संभाजीनगरमध्ये मनसे पाऊलच ठेऊ शकत नाही, असे कायंदे म्हणाल्या.