ठाणे : मनसे-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एकत्र धुळवड

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावून लोकसभा निवडणुकीत आपला एकच रंग असल्याचे संकेत दिले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघातू निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आणि मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी एकमेकांना रंग लावून येत्या २३ मेला एकत्र गुलाल उधळू असे जाहीर केले. यामुळे ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मनसेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

धुळवडीच्या निमित्ताने ठाण्यात राजकीय मतभेद विरुन मनसे राष्ट्रवादी एकत्र आले. एकमेकांना रंग लावण्याची परंपरा फार जुनी असली तरी लोकसभेच्या निवडणुकीमुळे या रंगपंचमीला वेगळेच महत्व आले आहे.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र कोणाला पाठिंबा देणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. परंतु रंगपंचमीच्या पार्श्वभुमीवर मनसे-राष्ट्रवादी एकत्र आल्याने मनसेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना रंगपंचीमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परांजपे आणि जाधव या एकमेकांना एकाच रंग लावून आपला एकच रंग असल्याचं जाहीर केले. विशेष म्हणजे मनसेने आयोजित केलेल्या धुलीवंदनाच्या कार्यक्रमात आनंद परांजपे यांना निमंत्रित करण्यात आले होते. मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा मिळाल्याने शिवसेना पक्षाच्या अडचणी काही प्रमाणात वाढणार आहेत.