आचारसंहितेत ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यास खळ्ळखट्याक

मनसेचा आक्रमक पवित्रा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारीत बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाला लोकसभा निवडणूक काळात प्रदर्शित करण्यास मनसेने विरोध केला आहे. लोकसभा निवडणूकांसाठी देशात आचारसंहिता लागू असताना हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने घेतला आहे. याशिवाय जर सिनेमा प्रदर्शित झालाच तर मनसे स्टाईलने खळ्ळखट्याक करणार असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने दिला आहे.

‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत निषेध नोंदवताना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले की, “समाजातील किंवा सिनेक्षेत्रातील प्रतिष्ठित लोक मोदी यांच्यावरील सिनेमासाठी आपलं योगदान देत आहेत, असा एक समज या सिनेमाच्या ‘पडद्यामागील’ लोकांना जाणीवपूर्वक पसरवायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना या गलिच्छ प्रचाराचा जाहीर निषेध करत आहे.”

पुढे बोलताना खोपकर म्हणाले की, “हा सिनेमा ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेचं पालन सर्वांनी करावं, असं अपेक्षित असताना सत्ताधारी पक्षच जर आचारसंहितेला असा पायदळी तुडवणार असेल तर हा गैरप्रकार रोखण्यासाठी मनसेलाच खळ्ळखट्याक करावं लागेल.”

दरम्यान, ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटात बालपासून पंतप्रधानपदापर्यंतचा मोदींचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. यात अभिनेता विवेक ओबेरॉय प्रमुख भूमिकेत आहे. बोमन इराणी, झरीना वहाब, बरखा बिष्ट सेनगुप्ता, मनोज जोशी आणि प्रशांत नारायणन या कलाकारांचीही सिनेमात मुख्य भूमिका आहे. रबजीत, मेरी कोम यांसारख्या बायोपिकचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.