पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणूक संपताच पनवेलच्या कामोठे येथील भाजप नगरसेवकाने ८ ते १० गुंडांना सोबत घेऊन मनसेच्या कार्यकर्त्याला खुर्च्या आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवघेणा हल्ला केला. सोमवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास ही घटना कामोठे येथे घडली. दरम्यान यात मनसे कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
विजय चिपळेकर असे भाजप नगरसेकवकाचे नाव आहे. तर मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. कामोठे पोलिसांनी याप्रकरणी विजय चिपळेकरसह ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
२९ एप्रिल रोजी म्हणजे काल मतदान संपल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांच्या साथीदारांनी प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. मध्यरात्री बाराच्या सुमारास केलेल्या या हल्ल्यात चिपळेकर आणि त्यांच्या साथीदारांनी प्रशांत जाधवला खुर्च्या आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर नगरसेवक आणि त्यांचे साथीदार तेथून पसार झाले आहेत. प्रशांत जाधव गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पनवेल मनपा निवडणूकीत नगरसेवक चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पकडण्यात आले होते. त्यात मनसे कार्यकर्ता जाधव यांचा हात असल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आला असल्याचं समजतं आहे.