शिवसेनेला डिवचण्यासाठी मनसेची ‘पोस्टरबाजी’, साहेबांचे खरे वारसदार…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात शिवरायांची राजमुद्रा असलेल्या आपल्या नव्या ध्वजाचे अनावरण केले. पक्षाने हा हिंदुत्त्वाचा अजेंडा हाती घेतल्यानंतर कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाण्यात “साहेबांचे खरे वारसदार हिंदूह्रदयसम्राट राज ठाकरे” असे बॅनर लावल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

raj thackeray

२३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मनसेनं घेतलेल्या महाअधिवेशनात मनसेनं फक्त झेंडाच बदलला नाही तर मनसेनं आपली राजकीय भूमिका बदलून हिंदुत्त्व हीच आता मनसेची भूमिका असणार हे यावेळी स्पष्ट केलं होतं. राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर शिवसेना आणि मनसेमध्ये राजकीय वातावरण पेटलं आहे, दोन्ही पक्षांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असताना ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी “साहेबांचे खरे वारसदार हिंदूहृदयसम्राट राज ठाकरे” या प्रकारचे बॅनर लावले. आता या बॅनरमुळे शिवसेना विरुद्ध मनसे यांच्यात थेट सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे.

‘उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लोभापायी जे केलंय. त्यामुळे हिंदूंचा त्यांच्यावरील विश्वास उडाला असून त्यांनी अयोध्येला जावं किंवा राम सेतू बांधावा हिंदू जनता आता राज ठाकरे यांच्यासोबत आहे आणि आता साहेबांचे खरे वारसदार हे राज ठाकरेच आहे,’ अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली.

‘सामना’तून मनसेवर जोरदार टीका :
मनसेप्रमुखांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका व त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडलेली मते मेळ खात नाहीत. भाजपची शिवसेनाद्वेषाची मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे व हे त्यांचे खेळ जुनेच आहेत,’ असं म्हणत शिवसेनेनं राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेबाबत चांगलाच समाचार घेतला.

“देशात शिरलेल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांना हाकलून द्या. नव्हे हाकलायलाच पाहिजे, याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, पण त्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाने झेंडाच बदलावा ही गोष्ट गमतीची आहे. दुसरी गंमत अशी की, त्यासाठी एक नव्हे, दोन दोन झेंड्यांची योजना करणे हे गोंधळलेल्या मनःस्थितीचे किंवा घसरलेल्या गाडीचे लक्षण आहे, अशी जहरी टीका करण्यात आली.

फेसबुक पेज लाईक करा –