नाशिक प्रकरणावर राज ठाकरे संतप्त; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 22 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेवरून देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर भाष्य केले. ‘आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. मात्र, जर कोणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवे’, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

महापालिकेच्या रुग्णालयात हा प्रकार घडल्यानंतर देशभरात एकच चर्चा सुरु आहेत. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी ट्विट करत यावर भाष्य केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं.’

दरम्यान, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची सखोल चौकशी होईलच, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.