मुख्यमंत्रीसाहेब, आधी वांद्रेतील घुसखोरांचे ‘मोहल्ले’ साफ करा, मनसेनं दिलं ‘उत्तर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या या मागणीसाठी मनसेकडून येत्या 9 फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाची मनसेकडून जोरदार तयारी सुरु असून संपूर्ण मुंबईत मनसेने पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्सवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेला मनसेने प्रत्युत्तर देताना वांद्रे पूर्व भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर पोस्टर लावले आहे. देशातल्या घोसखोरांआधी वांद्र्यातील घुसघोर हलवा असे आव्हान देण्यात आलं आहे. हे पोस्टर गुरुवारी रात्री लावण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेण्यासाठी मनसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी थेट मातोश्रीच्या बाहेर पोस्टरबाजी करत मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान दिले आहे. वांद्रेच्या कलानगरमधे लावण्यात आलेल्या पोस्टरवर लिहलं आहे की, माननीय मुख्यमंत्रीसाहेब पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलंलच पाहिजे हीच आपली भूमिका असेल तर प्रथम वांद्रेतील अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करा असे आव्हान देण्यात आले आहे.

यावर बोलताना मनसे उपाध्यक्ष अखिल चित्रे म्हणाले, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकला हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मुद्दा होता. पण आज तो मुद्दा राज ठाकरे पुढे रेटून नेत आहेत. मागील दहा वर्षात मनसेचा इतिहास पाहिला तर अनेकदा अशा मुद्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आम्ही कोणाला आव्हान केले नाही तर विनंती केली आहे असे त्यांनी सांगितले. तसेच रझा अकदामीत आझाद मैदानात दंगल झाली त्यावेळी मनसेने मोर्चा काढला होता. त्यावेळी हिंदुत्व बोलणारे कुठे गेले होते असा टोला शिवसेनेला लगावला.