‘महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर अर्वाच्च पद्धतीनं ओरडणारे आज गप्प का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचारादरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषन्न करणारं आहे पण त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता परस्पर अंत्यसंस्कार करणं. उत्तर प्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस रेप केसच्या घटनेवरून संपूर्ण देश संतापला आहे. अशात हाथरसमधील पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी निघालेल्या कुणालाही त्यांना भेटू दिलं जात नाही. या सगळ्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

याबाबत राज ठाकरे म्हणतात, “हाथरसमधील ही घटना पाशवी आहे. परंतु अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही. यावेळेस अशा प्रवृत्तीच्या विरोधात त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारनं वठणीवर आणलंच पाहिजे” अशी मागणी त्यांनी केली आहे. “त्या पीडित मुलीच्या घरच्यांना भेटायला कुणी जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे. त्यांना धक्काबुक्की का केली जात आहे. नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वत:च स्वत:ला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीनं ओरडणारे आज गप्प का आहेत. सर्व माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत. त्यांना का जाब विचारला जात नाहीये असे अनेक सवाल करत राज ठाकरेंनी गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र सरकारवर आगपाखड करणाऱ्या चॅनेलचा समाचार घेतला आहे.