राज ठाकरे आणि शरद पवारांची ‘भेट’ ; ४५ मिनिटे झाली चर्चा

मुंबई : पोलिसनामाऑनलाईन : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे ४५ मिनिटे राजकीय विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी सायंकाळी ही भेट झाली. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभेच्या तयारीला लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राजू शेट्टी यांनी मंगळवारी सायंकाळी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही. त्यानंतर राज ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. लोकसभा निवडणुकीत आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्या पार्श्वभूमीवर मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचाली आहेत. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काल काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीची मंथन बैठक झाली. या बैठकीत विधानसभेला मनसेला सोबत घेण्याचा महाआघाडीच्या नेत्यांचा सूर होता.

लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने एकही उमेदवार उभा न करता नरेंद्र मोदी व अमित शहा मुक्त भारताची हाक दिली होती. भाजपचा पराभव करण्यासाठी राज्यात राज ठाकरे यांनी प्रचाराची राळ उठवली होती. ‘लाव रे तो व्हीडिओ’हे त्यांचे वाक्य चांगलेच गाजले होते. परंतु राज यांच्या भाषणांमुळे मतांमध्ये परिवर्तन झाले नाही. एवढेच नव्हे तर मुंबईसह राज्यात राज यांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्यातील बहुतेक जागी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला.