‘…म्हणून राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे’, संजय राऊतांची पुन्हा एकदा मनसेला ‘साद’

पोलिसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रावर येऊ घातलेलं संकट आहे त्यासाठी राज ठाकरे असतील किंवा ज्यांचं या महाराष्ट्रावर प्रेम आहे त्यांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. यासाठी माझं सर्वांशीच बोलणं सुरू आहे असं मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मांडलं आहे. त्यामुळं शिवसेनेनं पुन्हा राज ठाकरे यांना साद घातल्याचं दिसत आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात दोन प्रमुख नेते कायम राज्याच्या हितासाठी लढत राहिलेत. एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे म्हणजे शरद पवार. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमी महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मितेचा झेंडा घेऊन राष्ट्रीय स्तरावर उभे राहिले आहेत. राजकीय मतभेद असतील परंतु महाराष्ट्रावर जे सकंट येत आहे त्यावेळी राज ठाकरेच नव्हे तर सर्वांनीच एकत्र आलं पाहिजे ही माझी भूमिका आहे” असंही ते म्हणाले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील प्रमुख नेते जे मराठी जपण्याचं काम करतायत, त्यांच्यामागे मराठी जनता उभी आहे. त्यांचा वापर करण्याचं आणि त्यांना बदनाम करण्याचं काम केलं जात आहे” असं म्हणत राऊतांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंबद्दल भाष्य केलं आहे.