Video : ‘लाव रे तो व्हिडीओ’ मधून मनसेची CM उध्दव ठाकरेंना आठवण ! म्हणाले – ‘स्वत:ची मागणी पूर्ण करा अन्…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळं पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात दाणादाण उडाली. ढगफुटीनं अनेक नद्यांना पूर आला. अनेक भागात शेतीही पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. त्यांच्यावर मोठं संकट ओढवलं आहे. या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विरोधकांकडून साततत्यानं ठाकरे सरकारवर दबाव टाकण्याचं काम सुरू आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे भाजपनं (BJP) शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अशी मागणी केली आहे. यानंतर आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ पोस्ट करून शेतकऱ्यांना मदत करा अशी विनंती केली आहे.

या व्हिडीओत सत्तेत येण्यापूर्वी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर भेटीगाठी करताना दिसत आहेत. त्यावेळी झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 25 हजारांची मदत करा अशी मागणी केली होती. शेतकऱ्यांना दिलासा देताना त्यांनी कागदे घोडे नाचवण्याआधी शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी आग्रही मागणी केली होती.

मनसे नेते बाळा नांदगावकर (MNS- Bala Nandgaonkar) यांनी ट्विट करत आपलं म्हणणं मांडलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “मुख्यमंत्र्यांनी जनभावना लक्षात घेऊन बांधावरची स्थिती बघितल्याबद्दल आभार. सोबत तुमचाच एक व्हिडीओ पोस्ट करत आहे. तुम्ही स्वत:च मागणी केल्याप्रमाणे सरसकट 25 हजार हेक्टरी द्यावे आणि स्वत:च केलेली मागणी पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.” असंही ते म्हणाले आहेत.