सरकार उंटावरून शेळया हाकत असल्या सारखं प्रशासन चालवत असल्याचा ‘मनसे’कडून आरोप

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे राज्यातील लाखो परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात परतले होते. आता पुन्हा हे मजूर महाराष्ट्रात दाखल होताना त्यांची नोंदणी केली जात असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली होती. मात्र मुंबईत दाखल होणार्‍या रेल्वेमधून दररोज अनेक परप्रांतीय नागरिक पुन्हा दाखल होऊ लागलेले आहेत. परंतु त्यांची कोणत्याही पद्धतीची नोंदणी केली जात नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलेला आहे.

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मुंबईत काम करणार्‍या लाखो परप्रांतीयांनी पुन्हा आपल्या राज्यात परत जाणे पसंत केले. या नागरिकांना पुन्हा आपल्या राज्यात परत जाण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ही मोठी मदत केली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील उद्योगधंदे बंद पडले, त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण राज्य ठप्प झाले होते. मात्र आता हळूहळू पुन्हा आपापल्या राज्यात परतलेले परप्रांतीय नागरिक, कामगार पुन्हा मुंबईच्या दिशेने येत असल्याचे दिसून येत आहे.

पुन्हा कामाच्या शोधात येणार्‍या प्रत्येक कामगारांची नोंदणी करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली होती. त्या पद्धतीने त्यांनी नियोजन ही केलं होतं. सुरुवातीला काही हजार कामगार पुन्हा मुंबईत दाखल झाल्याची माहितीही देण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दाखल होणार्‍या अनेक रेल्वेमधून पुन्हा परप्रांतीयांचे जथ्थे दाखल होत आहेत.

रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर या प्रवाशांच्या शरीराचे तापमान तपासण्यात येते. त्यानंतर त्यांच्या हातावर कोरंटाईनचा शिक्का मारून त्यांना रेल्वे स्टेशनच्या बाहेर सोडण्यात येत आहे. मात्र स्टेशनवर आल्यानंतर या प्रवाशांची अथवा मजुरांची कोणत्याही पद्धतीची नोंदणी केली जात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरकार उंटावरुन शेळ्या हाकत असल्यासारखे शासन वाटल असल्याची टीका त्यांनी केली.