‘अयोध्येला जाताय तेव्हा जाताना जनाची नाही किमान मनाची तरी…’, मनसेनं उद्धव ठाकरेंवर केली ‘टीका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अयोध्येतील रामजन्मभूमीच्या खटल्याचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. मात्र, २४ नोव्हेंबर रोजी असणारा त्यांचा नियोजित दौरा लांबणीवर पडला होता. त्यानंतर पुन्हा घोषणा करण्यात आली होती की मुख्यमंत्री ७ मार्चला अयोध्येत जाणार आहेत.

दरम्यान उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर मनसेने निशाणा साधला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिवसेनेला लक्ष केले. ते म्हणाले की, ‘लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांनी वडिलांच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून चौदा वर्षाचा वनवास भोगला आणि भरताला राज्य दिले. पण भरताने संधीसाधू पणा न करता रामचंद्रांच्या पादुका ठेवून राज्य केले. असा इतिहास असलेल्या अयोध्येला जाताय तेव्हा जाताना जनाची नाही किमान मनाची तरी….शुभेच्छा’ असं ट्विट त्यांनी केलं.

उद्धव ठाकरेंनी गेल्या वर्षीच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले होते. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल ९ नोव्हेंबरला दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. त्यांचा हा दौरा २४ नोव्हेंबरला नियोजित करण्यात आला होता. मात्र राज्यातील सत्तास्थापनेस झालेल्या विलंबामुळे त्यांचा हा नियोजित दौरा लांबणीवर पडला होता. दरम्यान उद्धव ठाकरे ७ मार्च रोजी असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येला भेट देणार असल्याचे समोर आले.