‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरला ‘मनसे’ कडून शुभेच्छा पत्र  

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. एव्हढेच नाही तर ती आगामी लोकसभा निवडणुकीकरिता काँग्रेसकडून मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. उर्मिलाच्या या  राजकीय क्षेत्रातील नव्या वाटचालीसाठी मनसे  महिला आघाडीच्या अध्यक्षा शालिनी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

शालिनी ठाकरे यांनी  त्‍यांच्‍या फेसबुक पोस्‍टमध्‍ये लिहिले आहे की, ”स्वतःमधील अंगभूत अभिनय गुणांच्या जोरावर एक अभिनेत्री म्हणून तू स्वतःचा स्वतंत्र ठसा बॉलीवूडवर उमटवलास. अनेक उत्तमोत्तम सिनेमे तुझ्या वाट्याला आले आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचं तू सोनं केलंस. आज काँग्रेसने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून तुझं नाव जाहीर केलंय. राजकारणात सक्रिय होण्याचा हा निर्णय तू निश्चितच संपूर्ण विचारांती घेतला असशील. या निवडणुकीच्या निमित्ताने तुझ्यासारखं एक संवेदनशील व्यक्तिमत्व राजकारणात आल्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना-समस्यांना आवाज फोडण्यासाठी तुझ्यामुळे मदत होईल, याची खात्री आहे. तुझ्या या नव्या इनिंगला ‘मनसे’ शुभेच्छा”, अशा शब्‍दात त्‍यांनी उर्मिला मातोंडकरला प्रोत्‍साहन दिले आहे.