पबमधला Video शेअर करत मनसेचा सवाल, म्हणाले – ‘युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना नाही का ?’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – मनसेचे नेते संतोष धुरींनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री ठाकरे कोरोना संपला नसल्याचे सांगतात. पण वरळीतल्या कमला मिलमध्ये 12 वाजून गेल्यानंतरही पब सुरू आहे. इतर ठिकाणी 11 वाजता बंद होणारे पब वरळीत रात्रीचे 12-1 पर्यंत कसे काय सुरु राहतात. त्यांना कोण परवानगी देत? असा सवाल धुरींनी उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरेंच्या मतदासंघात सर्व कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले जातात आणि मुख्यमंत्री सर्वसामान्यांना कोरोना गेला नसल्याचे सांगतात. सामान्यांसाठी कोरोना आहे. पण श्रीमंतांसाठी नाही. युवराज आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील ही परिस्थिती असल्याचे धुरी यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे आवाहन सरकार, प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र असे असतानाही नियमांना हरताळ फासला जात असल्याचा प्रकार मनसेने समोर आणला आहे. धुरींनी कमला मिल कंपाऊंडमधल्या युनियन पबमधून फेसबुक लाईव्ह केले आहे. पबमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. पबमध्ये कोणतही सोशल डिस्टन्सिंग दिसत नाही. तसेच अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. यावरून धुरींनी मंत्री आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले आहे.