‘मनसे संघटना आहे की पक्ष तेच कळत नाही, ती केवळ टाइमपास टोळी’ – मंत्री आदित्य ठाकरे

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आहे की संघटना हेच कळत नाही. त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर केवळ टाइमपास टोळी असल्याची खोचक टीका राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मनसेकडून शिवसेनेचा विरप्पन गँग असा उल्लेख केला होता. त्याबाबत विचारल असता ठाकरे यांनी मनसेला जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सेना-मनसे वाद आणखी उफाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत विरप्पन गँगचा पर्दाफाश करणार असल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर सेना आणि मनसेमध्ये जोरदार वाद रंगला होता. आज संदीप देशपांडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरुन खंडणी गोळा केली जात असल्याच्या पावत्या पुरावा म्हणून सादर करत शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेकडून फेरीवाल्यांना रितसर पावती देऊन खंडणी जमा केली जात असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आल असता मनसेला जास्त महत्व देण्याची गरज नसल्याच वक्तव्य केले आहे.

दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यासाठी राज्य सरकारने टॅक्स कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावरही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे. फडणवीसांनी जो सल्ला राज्य सरकारला देऊ केला आहे. तोच सल्ला त्यांनी केंद्राला दिला तर अधिक बरं होईल, असे ठाकरे म्हणाले.